Monday, February 27, 2012 | By: Unknown

मराठी भाषा दिन


श्री स्वामी समर्थ ..
नमस्कार दोस्तहो...

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी 
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी 
एव्हढ्या जगात माय मानतो मराठी 




 मराठी भाषा दिन : आजचा दिवस सर्वत्र मराठी दिन साजरा केला जातो.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.
पहिल्या विश्व मराठी संमेलनात जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना आकारास आली . ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार व कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांना मानवंदना देण्यासाठी २७ फेब्रुवारीला या कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाला जागतिक मराठी भाषा दिनाचे कोन्दण लाभले.
मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे.मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली.
शके १११० मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. या नंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तीपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली आहे.

सोनेरी भूतकाळ पण भविष्यकाळ ??
              अमृतातेही पैजा जिंकेल अशी आपली मराठी भाषा आहे.. परंतु भाषेचा भूतकाळ जेवढा चांगला , तेवढाच भविष्यकाळ चांगला राहील याची खात्री आपण देऊ शकू का ??मराठी भाषेवरील प्रेम वेगळं आणि ती उत्तम बोलणं वेगळं.आज मराठीमध्ये हिंदी आणि इंग्रजी शब्द घुसत आहेत.. काही इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द नाहीत.मान्य... पण बव्हंशी आपण शब्दांची भेळ करतो.आजच सकाळी एकाने मला "happy marathi bhasha day" अस ऐकवलं... खरच सांगतो तळपायाची आग मस्तकात गेली..दोन मुस्कटात वाजवाव्याश्या वाटल्या..

अरे! काय हे ??हि कुठली पद्धत झाली ?
आज कॉन्व्हेंट मध्ये मुलं जाताहेत.जावं..पण त्यामुळे त्याची आणि मराठीची नाळ तुटता कामा नये याची खबरदारी त्या आई-वडीलांनी घेणे क्रमप्राप्त आहे.जी घेतलेली दिसत नाही.
त्यामुळे होता काय कि पोराला च्रीस्ती प्रार्थना येते पण रामरक्षा,गणपती स्तोत्र येत नाही .वरून चारचौघात पालक कौतुकाने सांगतात .. "आमचा बाब्या किनई कॉन्व्हेंट मध्ये जातो नं..तिथे काय preyer असते .त्याला बाकी श्लोक बिक येत नाहीत...."यावर हसावं का रडावं तेच कळत नाही .
   एकाबाजूला हे चित्र असताना दुसरीकडे अशीही माणस आहेत की जी मराठीचे संस्कार उत्तम पद्धतीने पुढील पिढीकडे संक्रमित करताहेत.


एकूणच आपल्यात उत्साह आहे . मराठी भाषेवर अतोनात प्रेम आहे .पण भाजी घेताना मराठी भाजीवाला जरी असला तरी, "भैया ,कांदा कैसा दिया?" असं आपण का बोलतो याचा विचार प्रत्येकाने (बोलत असल्यास!! )करायला हवा!! रामराम !


0 comments:

Post a Comment

।।श्री स्वामी समर्थ।।